पुणे पोलीस काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १२/०१/२०२६ रोजी सकाळी सुमारे ०६.०० वाजता एका नायजेरीयन युवकास मारहाण झाल्याची घटना घडली होती.
जखमी युवकास उपचारासाठी रुबी हॉस्पिटल, वानवडी, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटल प्रशासनाकडून प्राप्त झाली.
घटनेची माहिती घेतली असता मयत युवकाचे नाव येमेका क्रिस्टीएन, वय अंदाजे ३८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ७०६, शार्लिन अव्हेन्यू, सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी, पुणे (मूळ रा. नायजेरीया) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत राहणाऱ्या चार नायजेरीयन मित्रांनी संगनमत करून डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर व हातावर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ११/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार हे करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे परदेशी नागरिक असून ते पळून जाण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ तीन विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सुमारे २५ ते ३० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानुसार आरोपी हे येवलेवाडी, पिसोळी व कॅम्प परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून खालील तीन नायजेरीयन आरोपींना ताब्यात घेतले :
जॉनपॉल ओबिन्ना मोनेके उर्फ ओबी, वय ३७ वर्षे, रा. शालिना अव्हेन्यू, पिसोळी, पुणे
नायेमेका मादूबुची ओनिया, वय ४२ वर्षे, रा. पिसोळी, पुणे
ओजेंग्वा, वय ४० वर्षे, रा. पिसोळी, पुणे.
तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली की, त्यांची मैत्रीण ग्लोरी हिच्याशी मयत येमेका क्रिस्टीएन बोलत असल्याच्या संशयावरून व प्रेमप्रकरणाच्या कारणावरून वाद झाला. त्यातूनच आरोपी किन्सली, जॉनपॉल ओबिन्ना मोनेके (ओबी), ओजेंग्वा व नायेमेका मादूबुची ओनिया यांनी मयतास मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे.
या प्रकारे काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या ०४ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली, अतुल नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, तसेच मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार पार पाडण्यात आली.
या कामगिरीत सपोनि विलास सुतार, अमित शेटे, रत्नदीप गायकवाड, विनायक गुरव, पूजा पाटील तसेच पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, किशोर पोटे, परशुराम पिसे, संजय बागल, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
