आलुर येथे महाशिवरात्री रोजी श्री गुरुपदेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

उमरगा / प्रतिनिधी :आलुर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त श्री  गुरुपदेश्वर मंदिर परिसरात पारंपरिक रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने व भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात पार पडली. हा धार्मिक सोहळा श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

रथयात्रेच्या प्रारंभी पुरवंतांच्या साक्षीने अग्निप्रवेशाचा विधी पार पडला. त्यानंतर वेदमूर्ती महांतय्या स्वामी यांच्या शुभहस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. पूजा संपन्न होताच संपूर्ण परिसर “हर हर महादेव” च्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तांच्या उत्साहात रथ ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

या रथयात्रा सोहळ्याचे आयोजन गुरुपादेश्वर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यात्रेनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन काडसिद्धेश्वर नागेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले.

संध्याकाळी प्रतिवर्षीप्रमाणे श्री सोमेश्वर मंदिर येथे अनुभव मंटप यांच्या वतीने सामूहिक इष्टलिंग पूजेचे आयोजन करण्यात आले.


दरम्यान, दि. १६ रोजी यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी धाराशिव, बादोला, अक्कलकोट, वागदरी, जमगा तसेच कर्नाटकातील बेळमगी येथील नामवंत पैलवान सहभागी झाले होते. अंतिम व अत्यंत रंगतदार कुस्ती ११ हजार रुपये रोख बक्षिसाची झाली. ती बेळमगी येथील पैलवान अमरेश यांनी जिंकली.

महाशिवरात्री निमित्त झालेल्या या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे आलुर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post

Popular Items