कहाण्या ज्ञानदीपांच्या’ पुस्तकाचे प्रकाशन व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

पुणे : राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक समूह, पुणे यांच्या वतीने ‘कहाण्या ज्ञानदीपांच्या’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ७० शिक्षकांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करण्यात आला. हा भव्य सोहळा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात संपन्न झाला.

या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी व इतर प्राथमिक शाळांमधील शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या शालेय जीवनातील प्रेरणादायी अनुभव मांडले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, प्रशिक्षण काळातील अनुभव तसेच विविध शाळांमधील कार्यपद्धती यांचे प्रभावी शब्दांकन या लेखनातून करण्यात आले आहे. राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक समूह, पुणे यांच्या माध्यमातून शिक्षकांना दरवर्षी ही लेखनसंधी दिली जाते. यंदा पुस्तक प्रकाशनाचे चौथे वर्ष आहे.

यावर्षी या पुस्तकाचे संपादन जयश्री जायभाये, संजय घोडके व आयुब शेख यांनी केले. या उपक्रमाची दखल घेत सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेतर्फे सहभागी सर्व ७० शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

शिक्षकांनी सादर केलेल्या लेखांचे परीक्षण शीतल मदने, प्रणिता कुलकर्णी, प्रीती आबनावे, निलम शेलार, वसुधा नाईक व विद्या सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी विजया महाडिक, उज्ज्वला फटांगरे, सुनीता कोद्रे, सुरेखा घोमण, चित्रा पेंढारकर, आफ्रीन मुल्ला, भारती भदाणे व सरोजिनी देवरे यांनी आर्थिक सहकार्य केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले यांच्या प्रतिकृती, वाचनीय पुस्तके तसेच प्रकाशित पुस्तक भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम चौरे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली) होते. प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी चव्हाण (उपप्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग – प्राथमिक, पुणे महानगरपालिका), राजेंद्र आंधळे (राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे), प्रा. डॉ. संदीप सांगळे (अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रतिभाताई पाटील (संस्थापक अध्यक्षा, सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र) व विजया महाडिक (सेवानिवृत्त शिक्षिका, पुणे महानगरपालिका) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुमला माने व ज्योती खबाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय माने यांनी केले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने