दादासाहेब गवई स्मारकाचे लोकार्पण; महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या थोर नेत्याला मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभिवादनाचा मान

अमरावती : मातीला जाणणारे आणि विकासाला मानणारे, महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या स्व. रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

स्मारकाचे वैशिष्ट्य : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,

“या स्मारकात ‘Viewing Gallery’ मधून दादासाहेबांचा संपूर्ण इतिहास दुर्मिळ छायाचित्रांसह पाहायला मिळतो. दृकश्राव्य माध्यमातून किओस्क तयार करण्यात आले असून, कृत्रिम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दादासाहेबांची निवडक भाषणे त्यांच्या आवाजात ऐकायला मिळतात. या सर्व गोष्टींमुळे हे स्मारक गुणवत्तापूर्ण व अभिमानास्पद बनले आहे.”

जनतेचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दादासाहेब 1998 साली अमरावतीचे खासदार झाले. यापूर्वी ते विधानसभेचे सदस्य, विरोधी पक्षनेते, उपसभापती व सभापती म्हणूनही कार्यरत होते.

“ते नेहमी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे राहून समाजहिताचा विचार करत. त्यांच्या निर्णयांवर सर्वांचा विश्वास होता,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

समता, धम्म व सामाजिक कार्याचा वारसा

दादासाहेबांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

“भगवान बुद्धांच्या धम्माचा आशीर्वाद घेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले, समाजातील दोष दूर करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या समतेच्या विचारांचा पुरस्कार करून जातीप्रथा संपुष्टात आणण्याचे कार्य त्यांनी केले,” असे ते म्हणाले.

भूषण गवईंच्या रूपात दादासाहेबांचे संस्कार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,

“दादासाहेबांचे सर्व गुण त्यांच्या सुपुत्रांमध्ये — सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई — यांच्यात दिसतात. वकील ते मुख्य न्यायमूर्ती या प्रवासात त्यांनी माणुसकीचा भाव कायम ठेवला. लोकांचे प्रेम व मान मिळवणारे गवई कुटुंब हे खर्‍या अर्थाने ‘अरबपती’ आहे.”

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने