उमरगा /मुरूम - जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा, मुरुम येथे ऑनलाईन बदलीने गेलेल्या शिक्षिका सुनिता मिरगाळे, मंगल कचले आणि रेणुका कुलकर्णी यांना भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या वतीने शाल, हार, पुष्पगुच्छ आणि फॅमिली टिफिन डबा भेट देऊन शिक्षिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये व धम्मभूषण धम्मचारी यांनीही सत्कार करून शिक्षिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे होत्या. यावेळी शा.व्य. समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये, सदस्य धम्मभूषण धम्मचारी, चंद्रकांत गोडबोले, महानंदा कांबळे, अश्विनी कांबळे, गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात निर्मलकुमार लिमये, धम्मभूषण धम्मचारी, रुपचंद ख्याडे, प्रमिला तुपेरे, अश्विनी कांबळे, शिवाजी गायकवाड व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
सुनिता मिरगाळे यांनी शाळेला साउंड सिस्टीम, रेणुका कुलकर्णी यांनी टेबल, तर मंगल कचले यांनी टेबल व विद्यार्थ्यांना खाऊ भेट दिला. बदलून आलेले शिक्षक अंगद थिटे आणि आशालता शिवकर यांचे स्वागतही याच प्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे यांनी मानले