मुरूम / प्रतिनिधी-
मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील सोलापूर–हैद्राबाद महामार्गावरील तुगाव फाट्याजवळील धाब्यावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजता धाड टाकली.
या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील गुन्हा मुरूम पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस अधिकारी आर. एस. गायकवाड करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून तुगाव मोडवरील एका धाब्यात बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू होता. जिल्हास्तरावरून पथक येऊन ही कारवाई करावी लागल्याने स्थानिक मुरूम पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उलट सुलट चर्चा व प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे बोलले जात असून, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दलही शंका व्यक्त होत आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, अशा अनैतिक प्रकारांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
