उमरगा :
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमरगा येथे तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.
पिके उध्वस्त, कुटुंबे संकटात
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके उध्वस्त झाली आहेत. शेतमाल, जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. “शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण आज या कण्यावर प्रचंड मोठे संकट आले आहे,” असे काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले.
हेक्टरी ५० हजार मोबदल्याची मागणी
काँग्रेस कमिटीने मागणी केली की धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांचा मोबदला तात्काळ जाहीर करून देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मदत मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी ” कार्यकर्त्यानी आपल्या मनोगतात व्यक्त केला .
काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड. धीरज भैया पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अश्लेष भैया मोरे, तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे यांच्यासह ज्येष्ठ नेते व विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.