पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खाजगी शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र यंदा पुणे शहरात आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कोणताही अधिकृत आदेश न निघाल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पालक युनियनतर्फे शिक्षण विभागाकडे प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्यात पुण्यातील सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांची प्रक्रिया उशिरा झाल्यास पालक अडचणीत येतात. लॉटरी पद्धतीमुळे प्रवेशाची खात्री नसल्याने आरटीई लॉटरी आधी काढल्यास प्रवेश न मिळालेल्या पालकांना इतर शाळांमध्ये वेळेत प्रवेश देता येतो, असे युनियनचे म्हणणे आहे.
पुणे शहरात सुमारे १९ हजार आरटीई प्रवेश जागा असून त्यासाठी ६० हजारांहून अधिक अर्ज केले जातात. प्रवेशासाठी आवश्यक असलेली आधार कार्ड, उत्पन्न दाखला आदी कागदपत्रे मिळवताना पालकांना वेळ व तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया लवकर सुरू करणे आवश्यक असल्याचे आम आदमी पार्टी पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या संदर्भात मुकुंद किर्दत, श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, हनुमंत शिंदे यांनी शिक्षण संचालक शरद गोसावी व सहसंचालक रमाकांत काठमोरे यांची भेट घेऊन पालकांच्या समस्या मांडल्या.