पुणे प्रतिनिधी-
गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदारांचे रॅकेट पुणे पोलीसांनी उध्वस्त केले आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे.
गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकीलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते. हे बनावट जामीनदार आरोपींच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करून, खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि ७/१२ उतारे तयार करत होते.
बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन मिळवून दिले जात होते. ४ जानेवारी २०२५ रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला. यामध्येच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
आरोपींकडून ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे, मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण ८९,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.