पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या रक्षणासाठी ‘जय बापू’, ‘जय भीम’, ‘जय संविधान अभियान’ अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस भवन येथून सुरू झालेली ही रॅली लोकमान्य टिळक पुतळा, म. फुले मंडई येथे समाप्त झाली.
या प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकताना सांगितले की, ‘‘भारताचे संविधान हे आपल्या सर्वांच्या हक्कांचे रक्षण करणारे आहे. लोकशाही, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव ही मूल्ये संविधानाने आपल्याला दिली आहेत. काही धर्मांध शक्ती संविधानाच्या संकल्पनांमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र देशातील कष्टकरी, मागासवर्गीय, भटके-विमुक्त, गरीब, दलित, अल्पसंख्याक, महिला आणि युवक या कटकारस्थानांना यशस्वी होऊ देणार नाहीत आणि संविधानाचे रक्षण करतील.’’
या रॅलीत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, NSUI चे माजी प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, माजी नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, मुख्तार शेख, सदानंद शेट्टी, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव आणि विविध ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीच्या माध्यमातून संविधानाच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला आणि लोकशाही व सामाजिक न्यायासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.