मुरूम /वार्ताहर-
बेळंब येथील शेतकरी सूर्यकांत सोलापूरे वय ५० यांचा शेतातील विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी घडली असून शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी उपसा करून मृतदेह काढण्यात आला.
मयत सूर्यकांत हे शुक्रवारी शेताला गेले होते मात्र सांयकाळी सात पर्यंत घरी आले नव्हते. त्यामुळे बंधू चंद्रकांत व कुटुंबातील इतर व्यक्ती शेतात जाऊन शोध घेत असताना विहिरीवर एकबाजूस सूर्यकांत यांचा बूट निर्देशनास आल्या. त्यामुळे सूर्यकांत हे विहिरीतील पाण्यात बुडाल्याचे शंका निर्माण झाल्याने चंद्रकांत यांनी गावातील लोकांना शेतात बोलावून घेतले.
अश्यातच रात्रीच्यावेळी शेतातील वीज पुरवठा बंद असल्या कारणाने विहिरीतील पाणी उपसा करता आले नाही. त्यामुळे रात्रभर घटनास्थळी कुटुंबातील व गावातील लोक बसूनच राहिले .शनिवारी पहाटे 4 वाजता वीज पुरवठा सुरू झाल्यावर विहिरीतील पाणी चार तासांपर्यंत उपसा करण्यात आले त्यानंतर सकाळी 7 वाजता सूर्यकांत यांचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने बाहेर काढण्यात आला.याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. संबंधित बिट अंमलदार एन.बी. वाघमारे,पोलिस कॉन्स्टेबल बी.आर.लोंढे यांनी पंचनामा केले. मुरूम रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले चंद्रकांत सोलापूरे यांच्या खबरवरून मुरूम पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे