मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील नळवाडी येथील चार तरुणांच्या टोळीने येणेगुर येथील दोन युवकांना छुल्लक कारणावरू चाकू, हंटर तसेच काट्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी दि. 31 डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एकाचे कान फाटले असून एकजण गंभीर रित्या जखमी आहे सदरील घटनेचा थरार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की येणेगूर येथील चंद्रशेखर कल्याणी माळी वय ४६ तसेच विकास मधुकर गाडेकर हे दोघेजण येणेगुर येथील रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन थांबले होते .यादरम्यान नळवाडी येथील दोघेजण अतिवेगाने दुचाकी चालवत असल्याचे दिसून आल्याने त्यामुळे चंद्रशेखर माळी यांनी त्यांना हटकले व गाडी सावकाश चालवण्यास सांगितले असे म्हणल्यावरून दुचाकीवरील दोघेजण गाडी थांबवून चंद्रशेखर माळी व गाडेकर यांना बुक्याने मारहाण करून चाकूने वार केले.
यावेळी नळवाडी येथील अन्य दोघेजण दुचाकीवरून येऊन माळी तसेच विकास गाडेकर यांना विविध हंटर अश्या हत्याराने वार करत राहिले या मारहाणीत विकास गाडेकर यांच्या डोक्याला चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर ३२ टाके पडले आहेत तर चंद्रशेखर माळी यांचे कान कापले गेले आहे.
ही घटना येणेगूर ग्रामपंचायत कार्यालयाने रस्त्यावर लावलेल्या सिसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गंभीर जखमी असलेल्या गाडेकर यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशिरा या घटनेची मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झल्याचे समजते. याप्रकरणी शंकर विलास कवठे, सुहास विलास कवठे, विठ्ठल महादेव दासमे, अंकुश फुलचंद जमादार चौघे राहणार नळवाडी ता उमरगा यांना मारहाणीत वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हेगारांना पोलिस विभागाकडून अभय?
दरम्यान आरोपीना वाचवण्यासाठी मुरूमचे पोलिस अधिकारी प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत संतापलेल्या येणेगुरच्या ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी मुरूम ठाण्यात येऊन रोष व्यक्त करताना दिसत होते.सदरील घटनेत आरोपीविरुद्ध पोलिसांकडून योग्य कलम लावण्यात आलेले नाहीत, गुन्हेगारांना पोलीस अधिकारी पाठीशी घालत आहेत, नळवाडी येथील गुन्हेगारांची टोळी येणेगुर गावात नेहमी दहशत माजवत आहेत या बद्दल तक्रारी असतानाही मुरूम पोलीस अधिकारी दुर्लक्ष करून गुन्हेगाराना एक प्रकारे अभय देत आहेत. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान आरोपीविरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी प्रसंगी येणेगुर बाजारपेठ बंद करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांकडुन देण्यात आला आहे
