पुणे दि. 24,प्रतिनिधी - लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार यंदा प्रथम वर्षी जाहीर करण्यात आला आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना येत्या गुरुवारी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये सदर पुरस्कार समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे यांनी दिली.
गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे सामाजिक कार्य, त्यांनी केलेली विविध आंदोलने, रुग्ण हक्क परिषदेचे संघटनात्मक कार्य आणि रुग्णांसाठी मोफत उपचारांच्या धोरणात्मक व कृतिशील प्रयत्नांसाठी यंदाचा आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार दिला जाणार असून या महत्वपूर्ण व वैचारिक कार्यक्रमासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष जयश्री हातागळे यांनी केले आहे.