आठ महिन्याच्या बाळाच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयातील पथकाचा पुढाकार

हृदय शस्त्रक्रिया नंतर बाळ आरव  

मुरूम/महेश निंबरगे

मुरूम/उमरगा दि.28- वरनाळवाडी येथील आठ महिन्याचा बाळ आरव महादेव अक्कलकोटे याला जन्मजात हृदयाशी संबंधित "सीएचडी" (कॉनजेनिटल हार्ट डिफेक्ट) हा आजार जडला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाने पुढाकार घेतला. या पथकाने आरवची शस्त्रक्रिया मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पूर्ण केली. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असून, उपचारानंतर आरवला शुक्रवारी, २७ डिसेंबर रोजी घरी सोडण्यात आले.

उमरगा तालुक्यातील मुरूम ग्रामीण रुग्णालयातील पथकाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वरनाळवाडी येथील अंगणवाडीत आरोग्य तपासणी केली होती. यावेळी आरवला जन्मजात "सीएचडी" आजार असल्याचे निदान झाले. त्वरित उपचारांची गरज ओळखून वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अरदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जी.एल. कांबळे, डॉ. तेजस्विनी सोनवणे, औषध निर्माण कर्मचारी गजानन ठोंबरे, व अधिपरिचारिका पुष्पा गोरे यांनी पुढाकार घेतला.

प्रथम आरवला धाराशिव येथे प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. दि. ४ डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. आरव आता पूर्णपणे ठणठणीत असून, त्याला उपचारानंतर २७ डिसेंबर रोजी घरी सोडण्यात आले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हा पुढाकार मुरूम ग्रामीण रुग्णालयाने उमरगा तालुक्यासाठी आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरवला आहे. या कामगिरीबद्दल वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने