आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरूनच बाबासाहेबांची वास्तू पाडण्यात आली असून महामानवाची ऐतिहासिक आठवण उद्धवस्त करण्यामागे महाविकास आघाडीचे षड्यंत्र असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टिचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला आहे.
देशात सामाजिक क्रांती घडवून आणणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची नागपूरातील एक ऐतिहासिक आठवण असलेली वास्तू उद्धवस्त करण्याचे पाप महाविकास आघाडीने केले त्यमागे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या आदेशावरूनच बाबासाहेबांची वास्तू पाडण्यात आली.
असा थेट आरोप पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी,आज गुरूवारी केला.
सरकारने आता भवन पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी यानिमित्ताने केली आहे.
२०१७ ला महानगर पालिकेने ही वास्तू महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली होती.
असे असताना आता कुणाच्या सांगण्यावरून ही वास्तू नेस्तनाभूत करण्यात आली ?
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा याप्रकरणाशी काय संबंध आहे?
असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
एसआयटी स्थापन करा
महामानवची आठवण असलेल्या हे स्मारक पाडण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायांसह महामानवाच्या विचाराला चालणाऱ्या समाज वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.अशात या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात यावी आणि तात्काळ या भूमिवर डॉ.बाबासाहेबांचे भव्य स्मारक, अभ्यासिका केंद्र तसेच भवन उभारण्यात यावे, अशी मागणी जयदीप कवाडे यांच्याकडून करण्यात आली आहे.
सरकारने यासंबंधी तात्काळ पावले उचलली नाही,तर आंबेडकरी चळवळीच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
अन्यथा पीआरपी राज्यभर आंदोलन करणार
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमिवर लाखो बांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्मदीक्षा सोहळ्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महानगरपालिकेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला होता.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापालिकेने १९७५ साली अंबाझरी उद्यानाजवळ १८.८६ एकर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासून हे भवन आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू बनले होते. पंरतु, हे भवन पाडून सरकारने आंबेकरी अनुयायांचे मन दुखावले आहे,
या प्रकरणावर निर्णय न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून पीआरपी राज्यभरात झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम करणार असे मत जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले.
(प्रसिद्धि पत्रकद्वारे दिलेल्या माहितीवरुन)