कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र मोहोत्सव भाविकांविना पार पडणार.

तुळजापूर दि. 26 : ऐतिहासिक परंपरा असलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव हा येत्या १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. त्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 रोजी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली.

सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोनाचे संकट अद्यापही टळलेलं नाही, संसर्गाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना दर्शनासाठी तुळजापुरात न येण्याचे आवाहन पुजारी वर्गांनी भाविकांना करावे, असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या आढावा बैठकीत सांगितले आहे.

शारदीय नवरात्रोत्वात कोरोनोच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळून मंचकी निद्रेसह, घटस्थापना, छबिना, अलंकार पूजा, सीमोलंघन आदी सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडणार आहेत. मात्र पुजारी, सेवेकरी यांच्या संख्येवर मर्यादा असणार असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सगळ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहे. 

या बैठकीत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे सुधीर कदम, संजय सोंजी, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सचिव श्रीराम आपसिंगेकर, मंदिर संस्थानचे जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदीजण उपस्थित होते.

त्यामुळे प्रतिवर्षी नवरात्रीच्या उत्सवात गजबजलेलं तुळजापूर क्षेत्र यंदा विविध प्रांतातील भाविकांविना सुने सुने भासणार आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने