सोलापूर- कोरोनामुळे अनेकांच्या हातातील काम गेल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात कर्ज परतफेड करणार तर कसे ?
आशा बिकट परिस्थितीत बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा सुरू आहे.
त्यावर आवर घालावा अशी मागणी करीत सोलापुरात वंचीत महिला आघाडी रस्त्यावर येऊन कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.
लोकडाऊन पूर्वी प्रत्येकाला कांही ना कांही काम होते. त्यामुळे बचत गटांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते परतफेड करणे सहज शक्य होत असे.परंतु लोकडाऊन झाल्या पासून गेली सहा महिने हाताला काम नाहीत.उसनवारी करून कसेबसे जीवन जगत आहेत. काढलेल्या बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
आशा बिकट परिस्थितीत बचतगट वसुली अधिकारी मात्र वसुलीसाठी तगादा लावत आहेत. घरातील वस्तू जप्ती करून त्याचा लिलाव करण्याच्या धमक्या देत आहेत. रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना बचत गटाचे हप्ते भरणार कुठून हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
भांडवलदारांना दिवाळखोरीत निघालेल्या धनदांडग्या लोकांचे सरकार कर्ज माफ करू शकते तर सामान्य जनतेच्या बचत गटाचे हप्ते का माफ करू शकत नाहीत. असा प्रश्न उपस्थित करून गरीब होतकरू कष्टकरी कामगार वर्गाच्या बचत गटाच्या हप्त्याची सर्व रक्कम माफ करून त्यांना जगण्यासाठी बळ प्राप्त करून द्यावे अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सोलापूर उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी वंचीत बहुजन महिला आघाडी राज्यकार्यकारणी सदस्या अंजना ताई गायकवाड, रेश्मा मुल्ला,वंचित बहुजन महिला आघाडी सरचिटणीस मा. नगरसेविका उषा ताई शिंदे, मंदाकिनी शिंगे, हेमा वाघमारे, पल्लवी सुरवसे, सुजाता वाघमारे,आशाताई गायकवाड, पुष्पाताई गायकवाड, सीमा सर्जे आणि अन्य महिला उपस्थित होत्या.