या कारवाईदरम्यान रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दुकाने, शेड, फलक आणि इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. मुख्य रस्ता मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे ये-जा करता येणार आहे.
नगर परिषद प्रशासनाने नागरिक व व्यावसायिकांना सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भविष्यातही अतिक्रमणाविरोधात अशाच प्रकारच्या नियमित कारवाया सुरू राहतील, असा इशाराही प्रशासनाने दिला.
मुरूम शहर कृती समितीने फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, टपरीधारक, फुलविक्रेते, हॉटेल व्यावसायिक व इतर लघु व्यावसायिकांसाठी नगर परिषदेकडून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर शहरातील काही नागरिकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप केला आहे. काही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली, तर काही ठिकाणांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांबाबत नगर परिषद प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.