स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मुरूम शहर काँग्रेसचे तीव्र आंदोलन


मुरूम : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुरूम शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट प्री-पेड मीटरच्या सक्तीविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.



मुरूम शहर व परिसरात सर्वसामान्य नागरिकांवर बळजबरीने स्मार्ट प्री-पेड मीटर लादले जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. अवाजवी व वाढीव वीजबिल, प्री-पेड प्रणालीमुळे आर्थिक अडचणीच्या काळात अचानक वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आणि मीटर रीडिंगच्या पद्धतीतील अपारदर्शकता यामुळे गरीब, शेतकरी व मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुरूम शहर व परिसरातील स्मार्ट प्री-पेड मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे, नव्याने बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत तसेच ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतेही नवीन मीटर सक्तीने बसवू नयेत, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

महावितरणने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनावेळी शहर अध्यक्ष ॲड. सुनील गायकवाड, उपाध्यक्ष व्यंकट बिराजदार, तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, युवा नेते सिद्धलिंग अप्पा हिरेमठ, संतोष येवले सर, बाबुराव बेगमपुरे, सुरेश गायकवाड, राजकुमार हिरेमठ, अनिल चव्हाण यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार,” असा निर्धार यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने