पुणे : मेरिकन नागरिकांना सायबर गुन्ह्यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मिलियन यूएस डॉलर्सचा गंडा घालणाऱ्या खराडी येथील बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. प्राइड आयकॉन बिल्डिंगच्या ९व्या मजल्यावर मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टंट एलएलपी नावाने सुरू असलेल्या या अनधिकृत कॉल सेंटरवर सायबर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकला.
या कॉल सेंटरमध्ये अॅमेझॉन खात्याचा गैरवापर होऊन ड्रग्स तस्करी झाल्याचे खोटे सांगून अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवली जात होती, आणि त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड खरेदी करून आर्थिक फसवणूक केली जात होती. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता अनेक संशयास्पद उपकरणे आणि सॉफ्टवेअरचा वापर करून फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले.
या कारवाईत खालील प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे:
1. सरजितसिंग गिरावतसिंग शेखावत (रा. झुंजुना, राजस्थान)
2. अजयकुमार पांडे (रा. अहमदाबाद, गुजरात)
3. श्रिमय परेश शहा (रा. अहमदाबाद, गुजरात)
4. लक्ष्मण अमरसिंग शेखावत (रा. अहमदाबाद, गुजरात)
5. अरोन अरूमन खिश्चन (रा. अहमदाबाद, गुजरात)
हे सर्व आरोपी सायंकाळी ६ ते पहाटे २ दरम्यान अमेरिकन वेळेनुसार कॉल सेंटर चालवत होते. या ठिकाणी १११ पुरुष व १२ महिला कर्मचारी कार्यरत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मिळवलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे आहे:
६४ लॅपटॉप्स (किंमत: ₹९,६०,०००)
४१ मोबाईल फोन्स (किंमत: ₹४,१०,०००)
४ राउटर्स (किंमत: ₹४,०००)
कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, इंग्रजी स्क्रिप्ट्स व इतर दस्तऐवज
एकूण मुद्देमाल: ₹१३,७४,०००
तपासात हे उघडकीस आले आहे की आरोपी अमेरिकी नागरिकांच्या लाखोंच्या संख्येतील मोबाईल क्रमांकांचा डेटा वापरत होते. फसवणुकीत मिळालेले डॉलर्स हे भारतातील बँकांमधून हवाला किंवा क्रिप्टो चलनाद्वारे फिरवले जात होते का, याचा तपास सुरू आहे. सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्र. ५७/२०२५ अंतर्गत भारतीय दंड विधानानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व खालील अधिकाऱ्यांनी केले:
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार
पोलीस उपायुक्त श्री. निखिल पिंगळे (सायबर व आर्थिक गुन्हे)
श्री. विवेक मासाळ, श्री. गणेश इंगळे, वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, प्रताप मानकर, वाईत पठार
पो. उपनिरीक्षक: तुषार भोसले, संतोष तानवडे, राम दळवी आदींचा समावेश होता.
सदर माहिती पुणे पोलिस मुख्यालयाने दिलेल्या प्रेस नोटनुसार नागरिकांसमोर मांडण्यात आली आहे.