मुकुंद किर्दत्त यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा आरोप; आम आदमी पार्टीचा सरकारवर निशाणा

 

पुणे, दि. 3 एप्रिल : Aam Aadmi Party (आप) महाराष्ट्राचे प्रवक्ते मुकुंद किर्दत्त यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप आपकडून करण्यात आला आहे. या कारवाईमागे केंद्र सरकारचा हस्तक्षेप असल्याचा दावा पक्षाने केला आहे.

आपच्या निवेदनानुसार, गुजरातमधील पक्षाचे फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंट यापूर्वीही बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रवक्त्यांचे अकाउंट बंद झाल्याने हा प्रकार दडपशाहीचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुकुंद किर्दत्त यांनी गेल्या काही दिवसांत महिला आरक्षण विधेयक, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेली विधाने तसेच पक्षातील घडामोडींवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यांच्या या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर २५ एप्रिल रोजी त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सदर अकाउंटवर ‘भारत सरकारच्या नोटीसमुळे अकाउंट बंद करण्यात आले’ असा संदेश दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करत हे पाऊल उचलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


या संदर्भात मुकुंद किर्दत्त यांनी सुप्रसिद्ध वकील Asim Sarode यांच्याशी संपर्क साधून सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित कारवाई करण्यापूर्वी स्पष्टीकरण मागवणे आवश्यक होते, असे सरोदे यांनी नमूद केले असून, बंदी उठवली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, आपने या कारवाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे म्हटले असून, सोशल मीडियावरून पक्षाची भूमिका मांडण्याचा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने