पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गु.रजि.क्र. ४९०/२०२५ बी.एन.एस कलम ६४, ६५(१), ६९, ७१, ९६, १३७(२) तसेच पोक्सो कलम ४, ८, १२ अन्वये दोन अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. एकाच वेळी दोन मुली गायब झाल्याने पोलिसांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत तपासाची दिशा व्यापक केली.
तपासादरम्यान संशयित आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळून आले. या क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून संशयितांनी मुलींना गुजरात आणि राजस्थान राज्यात नेल्याची माहिती समोर आली.
पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील (पूर्व विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, परिमंडळ-५चे पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिसांचे पथक गुजरात व राजस्थान येथे रवाना झाले.
सहा. पोलीस निरीक्षक अजय हंचाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच गुन्हे शाखा युनिट-५ मधील पोलीस हवालदार शशिकांत नाळे, गणेश माने यांनी वापी, सूरत, अहमदाबाद (गुजरात) तसेच फालना, शिवगंज, वाकली, अंडूर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपूर (राजस्थान) अशा विविध ठिकाणी तब्बल ३३०० किमी शोधमोहीम राबवली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन्ही मुलींचा ठावठिकाणा मिळवत त्यांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. एक मुलगी ता. राणी, जि. पाली (राजस्थान) येथे तर दुसरी मुलगी रा. पाली (राजस्थान) येथे आढळून आली.
दरम्यान, अल्पवयीन मुलींना फूस लावून नेणारे संशयित आरोपी, सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१ वर्षे, रा. राणी, राजस्थान) व सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१ वर्षे, रा. राणी, राजस्थान) यांना जेरबंद करण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले.
अल्पवयीन मुलींची सुटका करून आरोपींना अटक करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद असून ही संपूर्ण मोहीम एसीपी नम्रता देसाई (वानवडी विभाग), एसीपी राजेंद्र मुळीक (गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (काळेपडळ पोलिस स्टेशन) आणि पो.नि. अमर काळंगे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
