उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बिबवेवाडीत ‘दत्तक रस्ता’ योजनेचा शुभारंभ
पुणे – पुणे महानगरपालिका आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं धनकवडी येथे ‘दत्तक रस्ता’ योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवर, स्थानिक नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या सहभागातून शहरातील रस्त्यांची देखभाल आणि सौंदर्यीकरण साध्य होणार आहे. या उपक्रमाचं कौतुक करत अजितदादा पवार म्हणाले, “शहरातील विकासकामं वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. शासनाची विकासकामं करण्याची गती आणि नागरिकांचा सहभाग यांचा समन्वय साधणं, हेच शहराच्या सर्वांगीण प्रगतीचं बळ आहे.”
पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ चौक ते निलगिरी चौक या दत्तक रस्त्याचा शुभारंभ हा केवळ रस्ता प्रकल्प नसून, शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडी कमी करणारा, नागरिकांचं दैनंदिन जीवन सुलभ करणारा आणि स्मार्ट सिटी पुणे या स्वप्नाला बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजितदादांनी पुढे सांगितलं की, “पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्या आहेत आणि त्याच्या विस्तारासाठी उपाययोजना सुरू आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातही मेट्रो वाढवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा, दोन धावपट्ट्या असलेला विमानतळ पुरंदर येथे उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
पुण्यातील आयटी, ऑटो आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढ, तसेच चाकण–तळेगाव–रांजणगाव भागातील गुंतवणूक यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच शहरात पिण्याचं पाणी, रस्ते, वृक्षारोपण, क्रीडांगण, उद्यानं आणि सुलभ वाहतूक व्यवस्था या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं की, “शहराच्या विकासात प्रत्येकाने आपला वाटा उचलावा, शासन आणि जनतेच्या सहकार्याने पुण्याचं भविष्य अधिक उज्ज्वल बनवूया

