कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल


पुणे | प्रतिनिधी :

कोंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या कृष्णा सूर्यकांत आंधळे व त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


कोंढवा पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, या टोळीवर खंडणी, मारहाण, धमक्या आणि परिसरात भयाचे वातावरण निर्माण करण्याचे गंभीर आरोप आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीत कृष्णा सूर्यकांत आंधळे (वय ३६, रा. टोपे मळा, कोंढवा), अमीर शेख, राजेश दुर्मुख, गणेश वाघ आणि अमन मेहबूब खान यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्रितपणे नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार केले होते.


या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विस्तृत तपास करून प्रस्ताव तयार केला आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर संबंधितांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार वाघचौरे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजमणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील यादव यांच्या पथकाने केली.


पोलिसांच्या या कारवाईमुळे कोंढवा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने