प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणाऱ्या कांही घटना आज ही समाजात कुठे ना कुठे घडल्या जातात. प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श घडवणारी अशीच एक घटना कोंढवा येथे घडली आहे.
ब्रह्मा एक्झिबुरन्स रिक्षा स्टॅन्डचे सभासद श्री. समीर अन्सारी रिक्षा क्र. (MH12 QE 4102) यांनी आपल्या रिक्षामध्ये प्रवाशाने चुकून विसरलेले सोन्याचे दागिने कोणतीही स्वार्थी भावना न बाळगता तत्काळ परत करून समाजासमोर प्रेरणादायी माणुसकीचे उदाहरण ठेवले आहे.
घटनेची माहिती अशी की, कोंढवा येथील नताशा इंक्लेव्ह येथून कौसरबाग येथील बाबर हॉल येथे कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिला प्रवासी सौ. रौशीन अहमद (रा. बेंगलोर) या समीर अन्सारी यांच्या रिक्षामध्ये प्रवास करत असताना, सोने व चांदीचे दागिने तसेच आयफोन मोबाईल चार्जर असा सुमारे १५ ते २० हजार रुपयांचा ऐवज असलेली हॅण्डबॅग रिक्षामध्ये विसरल्या.
रिक्षा चालकास बॅग मिळताच त्यांनी आझाद रिक्षा चालक संघटनेचे शहर उपाध्यक्ष श्री. जावेद शेख यांना कळवले. त्यांनी तत्काळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शफीक भाई पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रवाश्याशी संपर्क साधून कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, ए.पी.आय. श्री. रवींद्र गावडे साहेब यांच्या उपस्थितीत सदर बॅग प्रवाशास सहानिशा परत करण्यात आली.
याबाबत बोलताना ए.पी.आय. रवींद्र गावडे साहेब म्हणाले,
“सर्वत्र रिक्षाचालकांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. रिक्षाचालक फक्त वाहतुकीचे साधन नाहीत, तर समाजातील विश्वासाचे प्रतीक आहेत.”
या प्रसंगी आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफीक भाई पटेल, शहर उपाध्यक्ष जावेद शेख, ज्येष्ठ रिक्षाचालक नूरभाई शेख उपस्थित होते.
प्रवासी सौ. रौशीन अहमद व त्यांचे वडील यांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकतेचे मनःपूर्वक कौतुक केले आणि म्हणाले —
“अशा सत्यनिष्ठ आणि जबाबदार चालकांमुळेच समाजातील विश्वास, मानवता आणि चांगुलपणाचा सुगंध कायम राहतो.”
