पुणे – सम्राट अशोक बुद्ध विहार साई नगर कोंढवा येथे भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य ज्ञानवर्धन प्रश्न स्पर्धा आयोजन करून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौध्द महा सभा झोन क्र 5 चे अध्यक्ष जगन्नाथ मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय बौध्द महासभेचे दिलीप सरोदे, केंद्रीय शिक्षक, आर.डी.गायकवाड केंद्रीय शिक्षक, आणि विठ्ठल कांबळे केंद्रीय शिक्षक.यासह पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि स्थानिक सम्राट अशोक बुद्ध विहारातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध रूप यांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात फुले, शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा सखोल आढावा मांडत असताना शाहू महाराजांचे आरक्षण धोरण संमधी यांचे विचार, सामाजिक कार्य, जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी घडवून आणलेले कायदे. अंतर्गत विवाह प्रोत्साहन, शेतकरी हिताचे धोरण, पाणी धरण निर्मिती, शैक्षणिक कार्य, मुलांना शाळेत नं पाठवणाऱ्या पालकांना दंड करण्याचे धोरण, महिला सबलीकरण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेरीस्टर होवून आल्यानंतर स्वतः मुंबई ला जावून घेतलेली त्यांचे भेट आणि माणगाव परिषदेत दिलेला मान सन्मान यावर मान्यवरांनी आपली विचारमंथनपर मते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी बौध्द समाज बांधवांना नियमितपणे बुद्ध विहारात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास बहुसंख्य महिला, पुरुष तसेच लहानग्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.सूत्रसंचालन नानासाहेब भारूड यांनी तर आभार प्रदर्शन राम आखाडे यांनी केले.