पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणी तीव्र आंदोलन; हुंडा छळा विरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे, २४ मे २०२५:

वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तिच्यावर करण्यात आलेल्या हुंड्यासाठीचा छळा विरोधात आज दुपारी आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीतर्फे गुडलक चौकाजवळील कलाकार कट्ट्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले.

“हुंड्याला राजकीय प्रतिष्ठा नको, हुंडा छळा विरोधात कठोर कारवाई करा, वैष्णवीला न्याय मिळवून द्या” अशा घोषणां देत  आक्रोश व्यक्त करण्यात आला.

आम आदमी पार्टीचे  प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी राजकीय संस्कृतीवर सवाल उपस्थित करून , "अजित पवारांसारख्या नेत्यांकडून लग्नात मोठ्या गाड्या दिल्या जातात, त्यातून चुकीचा संदेश समाजात जातो. सर्वच पक्षांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला अभय मिळते आणि बहिणी असुरक्षित राहतात. या आशा पुरुषप्रधान राजकीय संस्कृतीला आळा बसायला हवा." असे मत व्यक्त केले.

यावेळी पुणे शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले म्हणाल्या, "मंजुश्री सारडा खून खटल्यानंतर तब्बल ४५ वर्षांनंतर आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याच्या २० वर्षांनंतरही महिलांचा हुंड्यासाठी छळ होतो ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. सहा दिवस अपराधी मोकाट फिरतात, हे गृह विभागाचे अपयश आहे."

श्रद्धा शेट्टी म्हणाल्या की, "सामाजिक प्रतिष्ठेपायी महिला छळल्या जात आहेत. महिला आयोग, पोलीस, भरोसा सेल राजकीय हस्तक्षेपामुळे खिळखील्या झाल्या असून महिलांना आजही असुरक्षित जीवन जगत आहेत".

आप पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महिला आयोगाच्या  कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून अध्यक्षपदी कार्यक्षम आणि निर्भीड महिलेची नियुक्ती करण्याची मागणी केली.

या आंदोलनात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां पूजा वाघमारे, माधुरी गायकवाड, सुप्रिया बोबडे, उज्वला रोडगे, संगीता बागल, मुमताज शेख, उर्मिला वांजळे, अंजना वांजळे, सरुबाई वांजळे यांच्यासह शेखर ढगे, संजय कटारनवरे, राजेश ओवाळ, कीर्तीसिंग चौधरी, निलेश वांजळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने