मुरुम शहरात भिमजयंती जल्लोषात साजरी

http://मुरुम :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.१४) रोजी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन सोहळे उत्स्फूर्तपणे पार पडले. एकात्मतेचा आणि सामाजिक समतेचा संदेश देत शहरातील विविध जयंती उत्सव समिती, चौकातील मंडळे, विविध शाळा-महाविद्यालय, विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

मुख्य शहरातील जयंती भीमनगर येथे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस निमंत्रित डी. आय. गायकवाड, दिलीप भालेराव, रशीद गुत्तेदार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात बसवराज हावळे, चंद्रशेखर मुदकन्ना, किरण गायकवाड, विजयकुमार देशमाने, प्रा. दत्ता इंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाच्या कार्याला वंदन करण्यात आले. याशिवाय, यशवंतनगर समिती आयोजित डॉ. आंबेडकर चौक, भीमनगर, आनंदनगर या ठिकाणी स्थानिक जयंती उत्सव समित्यांच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी माजी नगरसेवक अजित चौधरी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहचले पाहिजेत, हे आपले कर्तव्य आहे. आजही बाबासाहेबांचे विचार समाजाला दिशा देतात, त्यांचा जागर सातत्याने व्हावा. तर अध्यक्षीय समारोप करताना माजी प्राचार्य दत्ता इंगळे म्हणाले की, सामाजिक परिवर्तनाचा मंत्र म्हणजे बाबासाहेब – त्यांनी दाखवलेली वाटच चालण्यासारखी आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्यास समाज प्रगतीपथावर जाईल."

याशिवाय शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. 

शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी संविधानाचे मूल्य पुन्हा जागृत करत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. या सर्व कार्यक्रमात एक गोष्ट ठळकपणे जाणवली – बाबासाहेबांचा प्रभाव समाजाच्या प्रत्येक घटकावर खोलवर आहे आणि त्यांचे विचार आजही नवा उजेड देतात. 

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन लखन भोंडवे यांनी मानले. मराठा सेवा संघाचे संजय सावंत, श्रीधर इंगळे, किशोर आळंगे, बाबा कुरेशी, सागर धुमुरे, आकाश च्यारे, हारून जेवळे, हुसेन तांबोळी, विशाल फणेपूरे, चांद गवंडी, शफीक जेवळे, सोहेल मुल्ला आणि चळवळीतील इतर कार्यकर्त्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने