मुरूम/प्रतिनिधी.- आज धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत आसुन त्याचे स्वतःच्या जगण्याकडे दुर्लक्ष होतं असल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी भौतिक सुखात गुरफटून न राहता स्वतःच्या आरोग्याची काळजी ही घ्यावी या उद्देशाने धाराशिव व लातूर सह परिसरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन चार व पाच मार्च रोजी आदर्श महाविद्यालय मध्ये करण्यात येत आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते ४ मार्च रोजी होणार आसुन यावेळी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीचे सर्व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मोफत आरोग्याची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्र, कान, नाक, घसा इत्यादीचे तज्ज्ञ डॉक्टरांचा माध्यमातून सल्ला, तपासणी आणि चाचणी, औषधी उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी सोलापूर, लातूर व उमरगा शहरातील विविध रोगावरील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्तपुरवठ्याची गरज भासते,आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही. म्हणूनच रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो.
आपल्या देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के रक्तदान करण्यासाठी सक्षम असतात. पण वर्षाकाठी यातले एक टक्का इतकेच रक्तदानासाठी पुढे येतात. त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे ३० लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते त्याची पूर्ती करण्याच्या प्रयत्नातून ५ मार्च रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिबिरात सहभागी होणाऱ्याचे मोफत रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे पाच मार्च रोजी वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तीच्या अडचणी लक्षात घेत त्यांना लागणाऱ्या महत्वाचे साहित्य हे व्यक्ती खरेदी करू शकत नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे व्यक्ती स्वतःसाठी या वस्तू खरेदी करू शकत नाही त्यामुळे दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली. दोन्ही दिवशी लाभार्थीचे आयुष्यमान भारत कार्ड काढले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, राशन कार्ड, मेडिकल रिपोर्ट्स येताना रुग्णांनी सोबत घेऊन यावे असे आवाहन भाजप नेते शरण पाटील यांनी केले तसेच भविष्यात प्रतिवर्षी महाआरोग्य शिबिर घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य श्रीराम पेठकर, माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, माजी नगरसेवक महेश माशाळकर, मारुती कदम आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रा शौकत पटेल यांनी केले.
परिसरातील रुग्णासाठी मोफत वाहनाची व भोजनाची सोय
परिसरातील रुग्णांना महा शिबिरास नेण्यासाठी व आणण्यासाठी मोफत वाहनाची सोय करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात तपासणीसाठी दाखल होणाऱ्या रुग्णासाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे. रुग्णांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी एक मध्यवर्ती मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
सुसज्ज मेडिकलची उभारणी
शिबिरस्थळी अत्यंत सुसज्ज मेडिकल उभारण्यात येणार आहे . मेडिकल हे शिबिराचे आकर्षण असेल. शिबिराच्या दिवशी रुग्णांना औषधे देण्यासाठी शेकडो फार्मसिस्ट सेवा देणार आहेत. सर्व आजारांवर मोफत औषधे या ठिकाणी रुग्णांना मिळतील.