सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुरूम शहर कडकडीत बंद

मुरुम ता. उमरगा :- बीड जिल्ह्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुश निर्घृण हत्येनंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्रभर या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.५) रोजी मुरूम शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्वच जाती-धर्मांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक अशी निषेध पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान दोन्ही चौकांमध्ये जमलेल्या नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, समाजमाध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मुरूम शहरातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभाग घेतला. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र संपूर्ण बंद शांततेत पार पडला.


यावेळी माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, मराठा सेवा संघाचे संजय सावंत, श्रीधर इंगळे, भीमराव फुगटे, गणेश जाधव, गजानन बेंडकाळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, भगत माळी, सचिन शिंदे, दादा बिराजदार, सिद्धलिंग हिरेमठ, विशाल मोहिते, अतुल सावंत, धोंडीबा शिंदे, ज्योतिबा शिंदे, गोपाळ इंगोले, सुधीर चव्हाण, नेताजी गायकवाड, जावेद शेख, संजय धुमुरे, संदीप बाबळसुरे, विकास सोबाजी, राजू धनशेट्टी, अविनाश झुरळे, सुदर्शन अवताडे यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत व सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनीं केली.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items