मुरूम/प्रतिनिधी: धाराशिव व लातूरसह परिसरातील नागरिकांसाठी आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे ४ व ५ मार्च रोजी भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते शरणजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन ४ मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार असून, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार
या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग यांसारख्या आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. यासाठी सोलापूर, लातूर आणि उमरगा येथील नामांकित डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.
५ मार्च रोजी महा रक्तदान शिबिर
आपल्या देशात दरवर्षी ३० लाख युनिट रक्ताची कमतरता भासते. याच पार्श्वभूमीवर ५ मार्च रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांचे मोफत रक्तगट तपासणीही केली जाणार आहे.
वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप
५ मार्च रोजी वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींना आवश्यक ते साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आवश्यक साहित्य घेणे शक्य होत नाही, म्हणूनच हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी सुविधा
दोन्ही दिवशी लाभार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मेडिकल रिपोर्ट्स रुग्णांनी सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत वाहतूक आणि भोजन व्यवस्था
शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मध्यवर्ती मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
सुसज्ज मेडिकल सेवा
शिबिरासाठी एक विशेष सुसज्ज मेडिकल उभारण्यात येणार असून, विविध आजारांवरील मोफत औषधे या ठिकाणी उपलब्ध असतील. यासाठी शेकडो फार्मासिस्ट सेवा देणार आहेत.
प्राचार्य श्रीराम पेठकर, माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, माजी नगरसेवक महेश माशाळकर, मारुती कदम आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रा. शौकत पटेल यांनी मानले.
(महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.)