मुरुम प्रतिनिधी -
मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त दि. 5 बुधवार रोजी धाराशिव जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधीक्षक एम एम आरदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मौखिक, स्तन व गर्भाशय कर्करोग जनजागृती अभियान राबवण्यात आले.
या अंतर्गत एन सी डी समुपदेशक सुजित जाधव यांनी मौखिक, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, अनियमित जीवनशैली आणि संसर्गजन्य कारणांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या आजाराचे लक्षण व शासकीय सुविधा याविषयी माहिती देत लवकर निदान आणि योग्य उपचाराने कर्करोग बरा होऊ शकतो, असा संदेश उपस्थितांना यावेळी देण्यात आला. तसेच तंबाखूविरोधी शपथ, माहितीपत्रके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रुग्णालयातील डॉ. आदिती पलमटे, डॉ. जी एल कांबळे, सचिन तेगडे, विजयकुमार भोसले, रवी लोहार, रत्नदीप घोसले, संदिप बाबळसुरे, अधिपरिचारिका शीतल सुरवसे, शिल्पा हिरवे, राजश्री जाधव, सुजाता मठपती, पुष्पा गोरे, पूजा जाधव, रजिया टाकले, श्रावणी भांडे, लखन भोसले यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.