गावगुंडांना अटक करा; कराळी ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयावर ठिय्या

उमरगा | प्रतिनिधी

कराळी (ता. उमरगा) येथील श्री आगजाप्पा देवस्थानात झोपलेल्या दोन विद्यार्थ्यांना गावगुंडांनी तलवारीचा व हॅटरचा धाक दाखवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापही संबंधित आरोपींना अटक न  झाल्याने ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडत गावगुंडांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे?

ग्रामस्थांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, संबंधित गावगुंडांना तात्काळ अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. "गावगुंडांना संरक्षण मिळत आहे का? पोलीस कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत?" असे सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

या आंदोलनामुळे प्रशासनावर तणाव वाढला असून, पोलीस विभाग पुढील कारवाई काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने