मुरुम :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अजित चौधरी, संजय आळंगे, जगदीश बेंडकाळे, दत्ता हुळमजगे, आरिफ कुरेशी, मनोज स्वामी, दादा टेकाळे, जगदीश निंबरगे यांच्यासह अनेक मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, शिवाजी महाराजांचे आदर्श समाजहिताचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच, रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, तरुणांनी समाजासाठी नेहमी तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात २०० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी केली, तसेच १५० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता, आणि त्यांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
सर्वरोग निदान शिबिरासाठी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. वैशाली जाधव, डॉ. मेघा पाटील, आनंद चव्हाण, महेश राठोड, अभिजीत जाधव तसेच मुरूम ग्रामीण रुग्णालयाकडून डॉ. तेजस्विनी सोनवणे, सुजित जाधव व सहकारी, रक्तदाब व शुगर तपासणी करिता मातोश्री पॅरामेडिकल लॅबचे डॉ. सुनील टीकांबरे व सहकारी, रक्तदान शिबिरासाठी सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे संचालक आदम शेख, आकाश शिखरे, मारुती मंठाळकर, रूपाली मोरे, लक्ष्मी भरले, अपूर्वा वाघमारे तसेच नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करिता लायन्स क्लब ऑफ सोलापूर हॉस्पिटलचे राजू जेऊरे आदींनी रुग्ण तपासणी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल मोहिते, पदाधिकारी नाना टेकाळे, जयसिंह खंडागळे, प्रवीण बिराजदार, शुभम भालकाटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठानच्या सदस्यांचा मोठा सहभाग लाभला. तसेच जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.