मुरूम शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बळीराजा मराठवाडा शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पणन विभागाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याबद्दल तसेच विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.सदरचे आंदोलन 2 जानेवारी पासून सुरूच आहे.
बाजार समितीमध्ये केलेल्या भ्रष्ट कारभाराबाबत सभापती व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करून समिती बरखास्त करण्यात यावी. याकरिता पणन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास सातत्याने पाठपुरावा केला अनेक स्मरण पत्रे दिली. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला दिलेल्या ठराविक वेळेच्या आत अंमलबजावणी करुन अहवाल सादर करावा असे आदेशान्वित केलेले असतानाही बाजार समितीने दखल न घेता या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्या अनुषंगाने पणन विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासह विविध मागण्यांसाठी २ जानेवारीपासून बाजार समितीच्या आवारात बेमुदत साखळी उपोषणास बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.
यामध्ये संघटनेच्या वतीने २५ जानेवारी २०२४ च्या आदेशातील अन्नधान्याच्या फरकाच्या रकमेबाबतचा निर्णय रद्द केलेले प्रभारी जिल्हा उपनिबंधक बी.व्ही.काळे यांची वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त चौकशी समिती नेमून खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस करुन सदर आदेशातील प्रकारच्या रकमेबाबतचा निर्णय पूर्ववत कायम करावा.तसेच सन. २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये खरेदीदारांनी खरेदी केलेल्या मालाच्या पावत्या, रजिस्टर नोंदी व विक्री केलेल्या शेतकऱ्यांची नामनिर्देशन यादी बाजार समितीच्या दर्शनी भागावर डकवावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करता मनमानी कारभार करणारी बाजार समिती बरखास्त करावी.
मागास प्रवर्गातील नागसेन हणमंतराव बनसोडे रा. मुरुम यांना नियमित भाडेतत्त्वावर विना डिपाॅझिट गाळा उपलब्ध करून द्यावा. शेतकरी समितीच्या कार्यालयाकरिता विनाअट गाळा उपलब्ध करून मिळावा. गाळा वाटपाबाबत केलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी चालू उपोषण स्थळी सर्वांसमोर लाईव्ह करण्यात यावी. आडत तीन टक्क्यांवरुन दोन टक्क्यांवर पूर्ववत करून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा.तसेच कडता, मात्रा, सूट इत्यादी सवलतीच्या नावाखालील शेतमालाची केलेली भरमसाठ लूट थांबवावी आणि सॅम्पल करिता नेलेला माल परत आणून जमा करावा.शेतकरी पट्टीच्या मागे अनाधिकृत पाकिट निहाय १५ रुपये हमाली लावण्यात येते ती बंद करावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, व शेतकरी वर्गातील मंडळींनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलन कर्ते सचिव श्री .उमाकांत मंगरूळे , अध्यक्ष श्री.आत्माराम वाघ , नागसेन बनसोडे रजनीकांत वाघ, यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.