पुणे दि,१६ : ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील नारायण पेठेत महाराष्ट्र मेडिकल सुरू करण्यात आले आहे. ते भारतातील पहिले चॅरिटेबल मेडिकल असून याची निर्मिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि रुग्ण हक्क परिषदच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
आज समाजात अनेक जण आपला व आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसावर लाखो रुपये खर्च करून साजरा करतात. याला फाटा देत कांहीजन सामाजिक बांधीलकी जोपासत आश्रम शाळा, वृद्धाश्रमात कपडे,फळे, खाऊ देऊन साजरे करतात.
अशाच सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने महाराष्ट्र मेडिकलला औषध खरेदीसाठी मदत म्हणून पुणे आकाशवाणीच्या निवृत्त अधिकारी मा.आशाताई मधुकर मांडे यांनी स्वतःच्या 82 व्या वाढदिवस निमित्त एक लाख रुपयांची देणगी दिली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आशाताई मांडे म्हणाल्या की, " हजारो लोकांना दुर्धर आजारांनी ग्रासलेले आहे, त्यांचे आयुष्य केवळ औषध व इंजेक्शनवर अवलंबून असते. परंतु परिस्थिती मुळे ते त्यांना वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे प्रसंगी कांहीना जीव ही गमवावा लागतो. याची जाणीव ठेवून मी एक लाख रुपये देत आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
धनादेश स्वीकारत आशाताई मांडे यांनी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल मुख्य विश्वस्त उमेश चव्हाण यांनी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले.यावेळी मुख्य विश्वस्त उमेश चव्हाण, संचालक अपर्णाताई मारणे साठ्ये आणि संचालक श्री. अशोक माझीरे उपस्थित होते.