मुरूम मध्ये शिवजयंती निमित्त सामाजिक सलोख्याचा संदेश - आणि शिवचरित्र वाटप उपक्रम


मुरुम ता. उमरगा

 प्रतिनिधी- मराठा सेवा संघ प्रणित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, विविध समाजघटकांच्या सहभागातून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश आणि संगम साधला गेला आहे. यातून खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचाराचा जागर दिसत असून यासोबतच शिवचरित्र वाटपाचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


सामाजिक ऐक्याचा आदर्श घालणारी कार्यकारिणी

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्व जाती-धर्मांतील मावळ्यांच्या योगदानातून उभे राहिले होते. त्याच धर्तीवर मुरूम शहरातील शिवजयंती सोहळाही सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे.

2025 सालासाठी गठित कार्यकारिणीत अध्यक्षपदी मुस्लिम समाजातील अल्फान दिवटे, उपाध्यक्षपदी बौद्ध समाजातील आशुतोष गायकवाड, तर सचिवपदी लिंगायत समाजाचे सागर धुमुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सर्व मंडळी शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांमध्ये सक्रिय असून, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे समितीचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी सांगितले.

शिवचरित्र वाटपाचा उपक्रम

शिवजयंती उत्सव केवळ सण म्हणून न साजरा करता, तो प्रेरणादायी विचारांचा जागर करणारा असावा, या उद्देशाने शिवचरित्र वाटप उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे विचार, त्यांचे धर्मनिरपेक्ष नेतृत्व आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेले कर्तृत्ववान निर्णय लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

या कार्यक्रमास मराठा सेवा संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित राहणार असून, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने