पुणे, दि. ०२ जानेवारी २०२६ :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते. यावेळी निवडणूक कामकाजाबाबत माहिती सादर करण्यात आली.
मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल यांनी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शी व शांततेत पार पाडण्याच्या सूचना दिल्या. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ व निष्पक्ष कार्यवाही करावी, उपद्रवी घटनांवर नियंत्रण ठेवावे तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या उल्लंघनांवर एफएसटी, एसएसटी व व्हीएसटी पथकांमार्फत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्वीप उपक्रम व निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीस पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागाचे अधिकारी तसेच निवडणूक कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते.
