मुरुम/ प्रतिनिधी.
मुरूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक परिसर आणि आलूर अक्कलकोट रोड अशा महत्वाच्या भागात नगरपरिषदच्या पथकाने गुरुवारी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असून आता नगर परिषदने ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता आणि लिंगायत समाज स्मशानभूमी परिसरात अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण रुग्णालय रस्ता व लिंगायत स्मशानभूमी अतिक्रमणच्या विळख्यात
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांसोबत वारंवार चर्चा करून त्यांना दुकाने व अतिक्रमित जागा हटवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी अतिक्रमण कायम राहिल्याने अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई सुरू केली.
जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत दुकाने व इतर बांधकामे हटवण्यात आली. अतिक्रमण हटविल्यानंतर या भागात ड्रेनेज लाईन व पेवर ब्लॉक टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित होईल, तसेच नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळेल.
शहरातील मुख्य चौक आणि रस्ते सुशोभित करण्यासाठीही नगरपरिषद वेगाने पावले उचलत आहे यापुढे अतिक्रमण झाल्यास वेळोवेळी कारवाई मोहीम राबवली जाईल असे पथकाने सांगितले आहे. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिममुळे स्थानिक व्यापारी, वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच राहतील, असे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नगरपरिषदेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मुरूम शहर स्वच्छ व सुंदर शहरासाठी पात्र ठरू शकते त्यामुळे कारवाई महत्त्वाचे पाऊल असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शहरात या कारवाईचे कौतुक होत असले तरी विशेष आमचेच दुकाने अतिक्रमणमध्ये होते का? तोंड पाहून ही मोहीम राबवली जात आहे ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान बसस्थानक परिसरासमोरील लिंगायत स्मशानभूमीच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे लिंगायत स्मशानभूमी ठिकाणी कोंबडे, बोकडे कापून विक्री करण्यासाठी दुकाने थाटल्या त्यामुळे लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याने अतिक्रमण काढण्यात यावी अशी मागणी बसवेश्वर युवक मंडळाने केली आहे.
तर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे येथील दुकानासमोर मोटारसायकली नेहमीच थांबून असतात त्यामुळे अरुंद रस्त्यातून तात्कालिक सेवेसाठी रुग्णवाहिका देखील यातून मार्ग काढू शकत नाही त्यामुळे सदरील रस्त्याकडील अतिक्रमण काढण्यात यावी अशी मागणी होत आहे