महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचे महायुती सरकारवर आरोप


उमरगा - राज्यात बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, आणि उद्योगधंदे बंद पडत आहेत. याला जबाबदार केवळ महायुती सरकार असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयी करून सत्ता द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनी केले.

येथील शिवाजी चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, उमेदवार प्रवीण स्वामी आणि आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यावर पंचसूत्री कार्यक्रम राबवू. यात महिलांना महिना 3 हजार रुपये, बेकारांना 4 हजार रुपये भत्ता, शेतमालाला हमीभाव, पीकविमा कायदा आणि शेतकऱ्यांचे 3 लाख रुपये कर्ज माफ करण्याचा समावेश असेल. महाराष्ट्राचा विकास केवळ महाविकास आघाडी करणार, त्यामुळे आघाडीच्या उमेदवार स्वामी यांना निवडून द्या.

यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आदर्श शिक्षक प्रवीण स्वामी यांना विजयी करा.

यावेळी उमेदवार प्रवीण स्वामी यांनी जनतेला आवाहन केले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, मला आपली आणि उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी.

यावेळी सुधाकर पाटील, ऍड. शीतल चव्हाण, ऍड. सयाजी शिंदे, अविनाश रेनके यांची भाषणे झाली. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे आश्लेष मोरे, शिवसेनेचे बाबुराव शहापुरे, आणि राष्ट्रवादीचे संजय पवार देखील उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने