जगाने अनमोल रत्न गमावले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १०:- निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे. अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे

पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे यांनी टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.

रतन टाटा यांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता,हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही.  त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे  होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते.  उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते. 

भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिवंगत टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्ववर चरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आसुन रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

         :अल्प परिचय :

○जन्म- 28 दिसम्बर 1937 (आयु 86)

○मृत्यू - 09 अक्टूबर 2024 मुंबई 

○पद्म विभूषण (2008) OBE (2009)

○निवास- कुलाबा, मुंबई भारत 

○राष्ट्रीयता- भारतीय,अविवाहित पारसी पंथ 

○शिक्षण - कॉर्नेल विश्वविद्यालय हार्वर्ड विश्वविद्यालय

○व्यवसाय - टाटा समूह 1962–2012 अध्यक्ष 

○ ते अविवाहित होते.

परिवार - नवल टाटा वडील, सोनू टाटा आई, जे॰ आर॰ डी॰ टाटा चाचा,सिमोन टाटा सावत्र आई, नोएल टाटा सावत्र भाऊ


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने