परभणीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी च्या सखोल चौकशीच्या मागणी साठी मुरूम शहर कडकडीत बंद

मुरूम दि.१६,प्रतिनिधी - परभणी येथे लॉ च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका रामनिंग मुदगडच्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी उमरगा तालुक्यातील मुरूम येथे कडकडीत बंद पाळून मागणीचे निवेदन देण्यात आले.

मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी आणि संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यास कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन रविवारी (ता. १५) रोजी मुरूम येथील संविधान प्रेमी भीमसैनिकांकडून प्रशासनाला देण्यात आले. 

या घटनेच्या निषेधार्थ मुरूम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिली होती. त्यांच्या आदेशानुसार मुरूम येथील संविधान प्रेमी, आंबेडकर वादी भीमसैनिक यांच्यावतीने मुरूम मध्ये शांततेत सोमवारी (ता. १६) रोजी बंद पुकारून शहरात मोर्चा काढण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप करून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देण्यात आले.घटनेच्या निषेधाचे व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. 

यावेळी सरकार भिमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे किरण गायकवाड, सुरज कांबळे यांच्यासह असंख्य संविधान प्रेमी भीमसैनिक उपस्थित होते.    मोर्चेदरम्यान कांही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनमुरूम पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने