हैदराबाद येथील हुसैन सागर तलावातील भगवान गौतम बुद्धाचा पुतळा !! संक्षिप्त इतिहास-

हैदराबाद येथील हुसैन सागर तलावातील भगवान गौतम बुद्धाचा पुतळा !!


संक्षिप्त इतिहास-
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री.एन.टी. रामाराव यांनी ‘भगवान गौतम बुद्धाचा’ एक भव्य पुतळा हैदराबाद येथील ‘हुसैनसागर’ तलावाच्या मध्यभागी उभारण्याच्या कामाला सुरुवात केली होती.
हा पुतळा उभारतांना अनेक अडचणी आल्या. पण त्यावर मात करत श्री.एन.टी.रामाराव यांचे स्वप्न पूर्ण झाले. या स्वप्नाचा एक इतिहास आहे.

या विषयी आपण जाणून घेऊ या.

श्री.एन.टी.रामाराव हे आंध्र प्रदेशचे १९८३ ते १९८९ या काळात मुख्यमंत्री असतांना १९८४ मध्ये ते न्यूयॉर्क येथे गेले होते. तिथे त्यांनी ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ पाहिला आणि त्यांच्या मनात एक कल्पना आली की आपणही एक बुद्धाचा मोठा स्टॅच्यु (मूर्ती) हैदराबाद येथे उभारला तर? 
पण बुद्धाचांच का? कारण ‘गौतम बुद्ध’ हा भारतात ‘सिद्धार्थ’ या नावाने जन्मला. तसेच तो मानवतेचे-शांततेचे प्रतिक आहे. ‘अहिंसा’ हे त्याच्या तत्वज्ञानाचे प्रमुख अंग आहे. त्याचे विचार हे मानवतेसाठी उपकारक आहेत. म्हणून त्याचा पुतळा उभारण्याचे त्यांच्या मनाने ठरवले. आणि मग भारतात परत आल्यावर त्या दृष्टीने एन.टी.रामाराव यांनी पावले टाकायला सुरुवात केली.
 प्रथम त्यांनी ‘रामेश्वरम’ जवळील एका गावात जन्मलेल्या आणि शिल्पकलेत नावाजलेले ‘स्थपती’ (म्हणजे वास्तुविशारद – Architect) “पद्मश्री” ‘सत्यनाथ मुथैय्या गणपती’ यांची या कामासाठी निवड केली. आणि त्यांच्या देखरेखी खाली पुतळा ‘घडवण्याचे’ काम सुरु करण्यात आले.  ज्यावेळी त्यांची या बुद्धाच्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी निवड झाली, तेव्हा प्रथम त्यांनी खूप विचार करून एका खूप मोठ्या, अखंड अशा पांढर्या रंगाच्या ‘ग्रानाईट’ दगडाची निवड केली. असा दगड त्यांना नलगोंडा जिल्ह्यातल्या ‘भोंगीर’ या गावाजवळ मिळाला. 
हैदराबाद येथून जवळच असलेल्या त्यांच्या ‘शिल्पशाले’त अनेक शिल्पकारांच्या सहाय्याने आणि श्री.सत्यनाथ मुथैय्या गणपती यांच्या देखरेखीखाली बुद्धाचा पुतळा घडवायला सुरुवात झाली. 
या कामाचा शुभारंभ श्री.एन.टी.रामाराव यांचे हस्ते ऑक्टोबर १९८५ मध्ये करण्यात आला.पाच वर्षानंतर हा ५८ फूट उंचीचा आणि ३५० टन वजनाचा बुद्धाचा सुंदर पुतळा तयार झाला. यासाठी अंदाजे २०=८० कोटी रुपये खर्च आला.

हा पुतळा उभारण्यासाठी प्रथम हुसैन सागर तलावाच्या मध्यभागी १५ फूट X १५ फूट या आकाराचा, पाण्याच्या पातळीच्यावर राहील असा ‘कॉन्क्रीट’चा भक्कम चौथरा उभा करण्यात आला, ज्याला ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ असे संबोधतात.

आता प्रश्न होता ‘बुद्धाचा’ पुतळा ‘शिल्पशाले’ पासून चौथर्यापर्यंत कसा न्यायचा? कारण वाटेत अनेक घरे होती. पण ती पाडण्यात आली. रस्ते अरुंद होते ते रुंद करण्यात आले. 
याच सुमारास श्री.एन.टी.रामाराव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
 कारण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. 
श्री.चेन्ना रेड्डी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. आणि हा बुद्धाचा पुतळा हुसैनसागर तलावाच्या नियोजित चौथ-यावर स्थानापन्न करण्याची जबाबदारी श्री.चेन्ना रेड्डी यांच्यावर येऊन पडली. 
बर्याच चर्चेनंतर आणि या कामासाठी मागवलेल्या टेन्डर्सनुसार मेसर्स ए.बी.सी.लिमिटेड या स्थानिक कंपनीला देण्यात आली. 
अर्थात त्यासाठी त्यांना मोठ्या थोरल्या ‘ट्रॉली’ची गरज लागली. या ट्रॉलीच्या सहाय्याने कंपनीने हा भव्य पुतळा हुसैन सागर तलावाच्या काठापर्यंत तर आणला.
पण पुढे तो मध्यभागी असलेल्या चौथ-यापर्यंत ‘वाहून’ नेण्यासाठी, त्यांनी एका मोठ्ठ्या ‘बार्ज’ची (लाकडी तराफा) व्यवस्था केली. १० मार्च १९९० रोजी ‘पुतळा’ त्यावर ठेऊन, तो लाकडी तराफा, ‘बुद्ध’ मूर्तीसह, तलावाच्या पाण्यात जेमतेम १०० फूट पुढे गेला नाही, तोच पुतळ्याच्या वजनाने तो एक तराफा कलंडला आणि बुद्धाचा पुतळा पाण्यात तलावाच्या तळापाशी जाऊन त्याला जलसमाधी मिळाली. 
या अपघाताच्या वेळी १० कामगार मृत्युमुखी पडले. पुढे तब्बल 2 वर्षें तो बुद्धाचा पुतळा पाण्याखाली होता. त्यानंतर तो पुतळा पाण्यातून काढून चौथ-यापर्यंत नेण्याचा प्रयत्न जवळ जवळ दोन वर्षे चालू होता. पण व्यर्थ.

शेवटी परदेशातून या विषयातल्या तज्ञांना पाचारण करण्यात आले आणि शेवटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा यशस्वीरित्या पाण्याबाहेर काढून चौथर्यावर १ डिसेंबर १९९२ रोजी व्यवस्थित बसवण्यात आला. आणि विधिवत बुद्धाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 
त्या चौथर्यापर्यंत लोकांना जाता यावे म्हणून कायमस्वरूपी ‘फेरी बोटीं’ची व्यवस्था करण्यात आली आहे. पुतळ्या भोवतालच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
 अशा त-हेने हा जगताला भगवान बुद्धाचा (त्यावेळचा) अत्यंत भव्य आणि सर्वात उंच पुतळा अनेक अडचणींवर मात करत उभारण्यात आला.
 २००६ मध्ये सुप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे शुभहस्ते पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली.
 त्यावेळी श्री.चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री होते. या ठिकाणी दरवर्षी हजारो प्रेक्षक भेट देत असतात. 
ते एक हैदराबाद मधले प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post